हेल्थ इन्शुरन्स
ओळख
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना अनेक गुंतागुंतीच्या बाबींचा समावेश असतो. पॉलिसीची माहिती अनेक पानांमध्ये विस्तृत स्वरूपात दिलेली असते, जी सर्वसामान्यांना समजणे कठीण जाते. त्यामुळे अनेकदा अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. याच कारणास्तव, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या काही महत्त्वाच्या बाबी आपण येथे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
वेटिंग पिरियड (Waiting Period) म्हणजे काय?
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड म्हणजे तुम्हाला काही विशिष्ट आजार किंवा उपचारांवर क्लेम करण्यासाठी लागणारा एक निश्चित कालावधी असतो. या कालावधीत तुम्ही पॉलिसी घेतल्यावर लगेचच काही आजारांवर क्लेम करू शकत नाहीत. वेटिंग पिरियड हा वेगवेगळ्या पॉलिसी आणि आजारांनुसार वेगळा असतो.
वेटिंग पिरियडची का लावला जातो ?
वेटिंग पिरियडचा मुख्य उद्देश म्हणजे जर तुम्हाला काही आजाराचे अगोदरच निदान झाले असेल किंवा आजार झाला असेल आणि त्याचा खर्च लगेच मिळावा म्हणून तुम्ही पॉलिसी काढून तुम्ही क्लेम दाखल करताय ही गोष्ट टाळणे असतो. जर वेटिंग पिरियड नसेल, तर काही लोक पॉलिसी घेऊन लगेचच मोठे उपचार घेण्यासाठी क्लेम करू शकतील, ज्यामुळे इन्शुरन्स कंपनीला मोठा आर्थिक भार येऊ शकतो. त्यामुळे वेटिंग पिरियडचा समावेश केला जातो.
वेटिंग पिरियडचे प्रकार:
सुरुवातीचा वेटिंग पिरियड: जवळपास सर्वच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये 30 दिवसांचा सुरुवातीचा वेटिंग पिरियड असतो. याचा अर्थ तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कोणत्याही आजारासाठी दावा करता येणार नाही. तथापि, अपघातांसाठी या वेटिंग पिरियडची अट लागू होत नाही.
उदाहरण:
समजा तुम्ही 1 जानेवारीला एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे. जर तुम्हाला 10 जानेवारीला ताप आला असेल, तर त्यासाठी तुम्ही क्लेम करू शकणार नाही. परंतु, जर तुम्हाला 20 जानेवारीला अपघात झाला तर त्यासाठी तुम्ही क्लेम करू शकता, कारण अपघातांसाठी वेटिंग पिरियड लागू नसतो.
- पूर्वीपासून असलेल्या आजारांसाठी वेटिंग पिरियड (Pre-existing Diseases Waiting Period):
जर तुम्हाला काही पूर्वीपासून अस्तित्वात असलेले आजार असतील (जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब), तर अशा आजारांवर दावा करण्यासाठी 2 ते 4 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. या काळात तुम्ही त्या विशिष्ट आजारासाठी इन्शुरन्स क्लेम करू शकत नाही.
उदाहरण:
जर तुम्हाला मधुमेह आहे आणि तुमच्या पॉलिसीमध्ये मधुमेहासाठी 3 वर्षांचा वेटिंग पिरियड आहे, तर पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षांपर्यंत तुम्ही मधुमेहाशी संबंधित कोणत्याही उपचारांसाठी क्लेम करू शकणार नाही.
- विशिष्ट आजारांसाठी वेटिंग पिरियड (Disease-Specific Waiting Period):
काही पॉलिसींमध्ये काही विशिष्ट आजारांवर दावा करण्यासाठी 1 ते 2 किंवा 3 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. या आजारांमध्ये किडनी स्टोन, कॅटरॅक्ट, हर्निया इत्यादी समाविष्ट असतात.उदाहरण:
जर तुमच्या पॉलिसीमध्ये कॅटरॅक्टसाठी 2 वर्षांचा वेटिंग पिरियड दिला आहे, तर तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर लगेच कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी दावा करू शकणार नाही. तुम्हाला 2 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.
वेटिंग पिरियड टाळता येतो का?
वेटिंग पिरियड टाळता येत नाही कारण तो प्रत्येक पॉलिसीमध्ये आवश्यक असतो. तथापि, काही इन्शुरन्स कंपन्या प्रीमियम वाढवून कमी वेटिंग पिरियड असलेल्या पॉलिसी ऑफर करतात. तसेच, जर तुमच्याकडे आधीपासून हेल्थ इन्शुरन्स असेल आणि तुम्ही नवीन पॉलिसीमध्ये पोर्ट करत असाल, तर पूर्वीची पॉलिसी कॅन्सल केलेल्या वेटिंग पिरियडचा कालावधी नवीन पॉलिसीमध्ये कमी होऊ शकतो.
वेटिंग पिरियडसाठी काय काळजी घ्यावी?
- पॉलिसी घेताना वेटिंग पिरियडचा कालावधी आणि कोणकोणत्या आजारांसाठी आहे, हे नीट तपासून घ्यावे.
- जर तुम्हाला पूर्वीपासून अस्तित्वात असलेले आजार असतील तर, त्यासाठी किती वर्षांचा वेटिंग पिरियड आहे हे लक्षात घ्या.
- जर तुम्हाला लवकर उपचारांची गरज असेल, तर कमी वेटिंग पिरियड असलेली पॉलिसी निवडण्याचा विचार करा.
रूम रेंट (Room Rent) म्हणजे काय?
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रूम रेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल असताना एका दिवसासाठी हॉस्पिटलच्या रूमचे भाडे, ज्यासाठी इन्शुरन्स कंपनी काही मर्यादित रक्कम देते. प्रत्येक पॉलिसीमध्ये रूम रेंटची लिमिट वेगवेगळी असते आणि ती एका निश्चित रक्कम किंवा एकूण सम इन्शुअर्डच्या टक्केवारीच्या रूपात असते.
रूम रेंटची लिमिट का असते?
रूम रेंटची लिमिट हा इन्शुरन्स पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोलींच्या दरांनुसार इतर खर्च देखील वाढतात. ज्या प्रकारची खोली तुम्ही निवडता, त्यानुसार डॉक्टरांची फीस, नर्सिंग शुल्क, औषधे, उपचार खर्च देखील वाढू शकतात. जर तुम्ही पॉलिसीमध्ये दिलेल्या रूम रेंटच्या लिमिटपेक्षा महागडी खोली घेतली, तर त्याचे अतिरिक्त शुल्क तुम्हाला स्वतः भरावे लागेल.
रूम रेंट लिमिटचे प्रकार:
- फिक्स रूम रेंट लिमिट (Fixed Room Rent Limit):या प्रकारात, पॉलिसीमध्ये एक निश्चित रक्कम दिलेली असते, जी एका दिवसाच्या रूम रेंटसाठी मिळते. उदाहरणार्थ, जर पॉलिसीमध्ये एका दिवसाची रूम रेंट लिमिट ₹3000 असेल, तर त्यापेक्षा जास्त रक्कम भरावी लागल्यास ती तुम्हाला स्वतःच्या खिशातून द्यावी लागेल.
उदाहरण:
जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये 4 दिवस दाखल असाल आणि प्रति दिवसाची रूम रेंट ₹4000 आहे, तर पॉलिसीच्या लिमिटनुसार फक्त ₹3000 प्रति दिवस इन्शुरन्स कंपनी भरेल, आणि उर्वरित ₹1000 प्रति दिवस तुम्हाला भरावे लागतील.
- सम इन्शुअर्डच्या टक्केवारीवर आधारित लिमिट (Percentage of Sum Insured): काही पॉलिसींमध्ये रूम रेंटची लिमिट सम इन्शुअर्डच्या टक्केवारीवर आधारित असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या पॉलिसीची सम इन्शुअर्ड रक्कम ₹5 लाख आहे आणि रूम रेंटची लिमिट 1% आहे, तर तुम्हाला प्रतिदिन फक्त ₹5000 पर्यंतचा रूम रेंट मिळू शकेल.
उदाहरण:
जर तुमची सम इन्शुअर्ड रक्कम ₹5 लाख आहे आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एका दिवसाची रूम रेंट ₹6000 आहे, तर इन्शुरन्स कंपनी ₹5000 (सम इन्शुअर्डच्या 1% लिमिट) भरेल आणि तुम्हाला ₹1000 स्वतःला द्यावे लागेल.
- रूमच्या प्रकारावर आधारित लिमिट (Room Type-Based Limit): काही पॉलिसीमध्ये, विशिष्ट प्रकारच्या खोलीसाठी लिमिट घालण्यात येते. जसे की “सिंगल प्रायव्हेट रूम” किंवा “सेमी-प्रायव्हेट रूम” या प्रकारांच्या निवडीवर आधारित लिमिट असू शकते. जर तुम्ही त्यापेक्षा महागडी खोली घेतली, तर त्याचे अतिरिक्त खर्च तुम्हाला स्वतः द्यावे लागतील.
उदाहरण:
जर तुमच्या पॉलिसीमध्ये सेमी-प्रायव्हेट रूमसाठी परवानगी असेल, आणि तुम्ही प्रायव्हेट रूम घेतली, तर त्यासाठीचा अतिरिक्त खर्च तुमच्यावर येईल.
रूम रेंट लिमिटचे महत्त्व:
रूम रेंट लिमिटचा तुम्हाला अंदाज असणे महत्त्वाचे आहे, कारण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या वेळी योग्य खोली निवडणे खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी गरजेचे असते. जर रूम रेंटची लिमिट न समजल्यास, उपचारानंतर मोठे बिल तयार होऊ शकते आणि त्याचा अतिरिक्त भार तुमच्यावर येऊ शकतो.
- फायदे:
- को-पेमेंट असलेल्या पॉलिसीचे प्रीमियम सामान्यतः कमी असतात.
- तोटे:
- मोठ्या उपचार खर्चाच्या वेळी पॉलिसीधारकाला अधिक रक्कम स्वतः भरावी लागते.
- जास्त वयाच्या व्यक्तींसाठी किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी को-पेमेंट मोठा आर्थिक भार ठरू शकतो.
को-पेमेंट कधी लागू होते?
को-पेमेंट विविध परिस्थितींमध्ये लागू होऊ शकते:
- जर पॉलिसीधारकाने पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या हॉस्पिटल्सच्या नेटवर्कबाहेरील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तर.
- काही पॉलिसी वयोमर्यादेनुसार को-पेमेंट लावतात. उदाहरणार्थ, 60 वर्षांवरील व्यक्तींना को-पेमेंट लागू असू शकतो.
- काही प्रीमियम कमी असलेल्या पॉलिसींमध्ये को-पेमेंट लागू असतो, ज्यामुळे पॉलिसीची किंमत कमी होते.
हेल्थ इन्शुरन्समध्ये रिस्टोरेशन/रिफिल म्हणजे काय?
हेल्थ इन्शुरन्समध्ये रिस्टोरेशन म्हणजे एखाद्या वर्षात पॉलिसीची कव्हरेज संपूर्णपणे वापरल्यानंतर, इन्शुरन्स कंपनीद्वारे अतिरिक्त कव्हरेज प्रदान करणे. हे फीचर मुख्यतः तेवढ्या वेळी उपलब्ध होते जेव्हा आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची संपूर्ण सम इन्शुर्ड (Sum Insured) रक्कम एका वर्षात वापरली जाते.
उदाहरण:
समजा, आपल्याकडे ₹5 लाखांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. एका वर्षात आपण आपल्या पॉलिसीतील सर्व ₹5 लाख रक्कम वापरली, तरीही आपल्याला आणखी एकदा ₹5 लाखांची कव्हरेज मिळू शकते. हे अतिरिक्त कव्हरेज मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे रिस्टोरेशन .
रिस्टोरेशनचे महत्त्व:
- अतिरिक्त सुरक्षा: जर एखाद्या वर्षात आपल्याला मोठ्या उपचारांची गरज पडली, तर रिस्टोरेशन फीचर आपल्याला अतिरिक्त आर्थिक सहाय्य पुरवते.
- एकाच वर्षात अनेक उपचार: जर एका वर्षात एकापेक्षा अधिक वेळा उपचारांची गरज पडली, तर रिस्टोरेशन आपल्याला दुर्घटनेमुळे झालेल्या अतिरिक्त खर्चांवर मदत करू शकते.
- फॅमिली फ्लोटिंग पॉलिसीसाठी उपयुक्त: जर आपली पॉलिसी फॅमिली फ्लोटिंग पॉलिसी असेल आणि एखाद्या वर्षात फॅमिलीमधील एक किंवा अधिक सदस्यांना उपचारांची गरज पडली, तर रिस्टोरेशन फीचर उपयुक्त ठरू शकते.
रिस्टोरेशनच्या अटी:
- रिस्टोरेशन लिमिट : रिस्टोरेशनची रक्कम मूळ सम इन्शुर्ड रकमेइतकीच असते किंवा त्यापेक्षा कमी असू शकते.
- वारंवार वापर: काही पॉलिसींमध्ये एका वर्षात एकापेक्षा अधिक वेळा रिस्टोरेशन मिळू शकते, परंतु हे पॉलिसीच्या अटींवर अवलंबून असते.
- रिस्टोरेशन फी: काही पॉलिसींमध्ये रिस्टोरेशनसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.
उदाहरण:
समजा, आपल्याकडे ₹3 लाखांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि आपण एका वर्षात सर्व ₹3 लाख रक्कम वापरली. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा ₹3 लाखांची कव्हरेज मिळू शकते, जर आपल्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन फीचर असेल.
हेल्थ इन्शुरन्समधील रिस्टोरेशन हे एक महत्त्वाचे फीचर आहे, जे आपल्याला एखाद्या वर्षात अतिरिक्त आरोग्य संबंधित खर्चांना सामोरे जाण्यास मदत करू शकते. यामुळे आपण आपल्या आरोग्याची चिंता न करता उपचार घेऊ शकता. पॉलिसी घेताना रिस्टोरेशन फीचरचा समावेश आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.
नो क्लेम बोनस (No Claim Bonus) म्हणजे काय?
नो क्लेम बोनस म्हणजे, जर तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या कालावधीत एकही क्लेम केला नाही, तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला एक विशेष बोनस देते. नो क्लेम बोनस मिळवण्यासाठी इन्शुरन्स कंपनी प्रीमियममध्ये सूट, कव्हरेज वाढवणे, किंवा इतर फायदे देऊ शकते.
नो क्लेम बोनस कसा मिळतो?
नो क्लेम बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला पॉलिसीच्या कालावधीत एकही क्लेम न करणे आवश्यक आहे. पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी, इन्शुरन्स कंपनी नो क्लेम बोनस दिल्यास, तुम्हाला प्रीमियममध्ये सूट किंवा कव्हरेजमध्ये वाढ मिळू शकते.
नो क्लेम बोनसचे महत्त्व:
- कव्हरेज वाढवणे (Increased Coverage):
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस हा कव्हरेज वाढवणे यानुसार असल्यास त्या पॉलिसीचे कव्हरेज हे टक्केवारीनुसार किंवा रकमेनुसार वाढवले जाते. बऱ्याच पॉलिसीमध्ये ते टक्केवारीनुसार वाढवले जाते.
उदाहरण:
समजा तुमच्याकडे ₹5 लाखांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, आणि तुम्ही पॉलिसीच्या कालावधीत एकही क्लेम केला नाही. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 50% नो क्लेम बोनस देत आहे. तुमची पॉलिसी ₹5 लाखांची आहे. 50% नो क्लेम बोनस म्हणजे ₹2.5 लाख. यामुळे तुमची कव्हरेज ₹5 लाख ऐवजी ₹7.50 लाख होईल. त्यामुळे, तुम्हाला ₹2.5 लाख ची वाढीव कव्हरेज मिळेल.
- प्रीमियममध्ये सूट (Premium Discount):
नो क्लेम बोनस मिळाल्यास तुमच्या पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तुम्हाला प्रीमियममध्ये सूट मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 10% नो क्लेम बोनस मिळालं, तर तुमच्या पॉलिसीचा प्रीमियम 10% कमी होईल.
उदाहरण:
समजा तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम ₹25,000 आहे आणि तुम्हाला 10% नो क्लेम बोनस मिळालं आहे. 10% नो क्लेम बोनस असल्याने तुमच्या पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तुम्हाला ₹25,000 च्या प्रीमियमवर 10% सूट मिळेल. म्हणजेच तुमचा नवीन प्रीमियम ₹22,500 असेल.
फ्री हेल्थ चेकअप्स (Free Health Checkups) म्हणजे काय?
फ्री हेल्थ चेकअप्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीधारकाला इन्शुरन्स कंपनीकडून ठराविक कालावधीत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय तपासण्या. या तपासण्यांमध्ये ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, एक्स-रे, शुगर चेकअप, बीपी मॉनिटरिंग, आणि इतर प्राथमिक तपासण्या समाविष्ट असतात. हा लाभ साधारणत: वर्षातून एकदा किव्वा दोनवेळा भेटू शकतो तुमच्या पॉलिसीच्या अटींनुसार.
उदाहरण:
समजा, तुमच्याकडे 10 लाख रुपयांचे हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज आहे. इन्शुरन्स कंपनीच्या अटींनुसार, तुम्हाला दरवर्षी किंवा दोन वर्षांनी फ्री हेल्थ चेकअप्सचा लाभ घेण्याचा अधिकार आहे.
जर तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षे झाली असतील आणि तुम्हाला शुगर, कोलेस्ट्रॉल, आणि इतर चाचण्या करायच्या असतील, तर इन्शुरन्स कंपनीने निश्चित केलेले केलेल्या नेटवर्क हॉस्पिटल किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तुम्ही या चाचण्या करू शकता. यासाठी तुम्हाला काहीही पैसे भरावे लागत नाहीत, कारण हा खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करते.
अटी:
फ्री हेल्थ चेकअपचा खर्च एकूण कव्हरेज रकमेवर (Sum Insured) परिणाम करत नाही.
ही सुविधा फक्त नेटवर्क हॉस्पिटल किंवा इन्शुरन्स कंपनीने निश्चित केलेल्या केंद्रांमध्येच उपलब्ध असते.
फ्री हेल्थ चेकअपसाठी काहीवेळा पूर्व-मंजुरी (Pre-Approval) घ्यावी लागू शकते.
काही पॉलिसीमध्ये फ्री हेल्थ चेकअप्सची मर्यादा ठरलेली असते, जसे की ठराविक चाचण्या किंवा विशिष्ट रक्कम. फ्री हेल्थ चेकअप्स ही सुविधा तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी जागरूक ठेवण्यास मदत करते आणि वेळेवर उपचार सुरू करण्याची संधी देते. याचा वापर करून तुम्ही गंभीर आजारांचे निदान लवकर करू शकता आणि मोठ्या खर्चाचा सामना टाळू शकता.
वेळच्या वेळी हेल्थ चेकअप करून घेणे फायदेशीर असते, कारण याचा फायदा न घेतल्यास ही सुविधा वाया जाऊ शकते. फ्री हेल्थ चेकअप्स म्हणजे तुमच्यासाठी आरोग्याची वेळेवर देखभाल करण्यासाठी दिलेली एक सुविधा आहे, ज्यामुळे तुमचे आरोग्य आणि पैशांची बचत दोन्ही होते.
आयुष ट्रीटमेंट्स (Aayush Tratments) म्हणजे काय?
आयुष ट्रीटमेंट्स अंतर्गत आयुर्वेद, नॅचुरोपॅथी आणि होमिओपॅथी यांसारख्या उपचार पद्धती येतात. या पद्धती प्राचीन भारतीय वैद्यकीय परंपरेचे भाग मानल्या जातात आणि शरीराच्या समग्र आरोग्याशी निगडित असतात. या नैसर्गिक आणि पारंपारिक उपचारांवर अनेक जण विश्वास ठेवतात, कारण ते दीर्घकालीन फायदे देतात. आयुर्वेद आणि नॅचुरोपॅथी उपचार पद्धतींना आजच्या आरोग्य इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जात आहे, ज्यामुळे रुग्णांना अधिक पर्याय आणि सुरक्षा मिळते.
तुमच्या आरोग्य इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आयुष उपचारांचा समावेश असल्यास, तुम्हाला या उपचारांवर येणारा खर्च कमी होतो, परंतु त्यासाठी काही अटी असतात:
- मान्यताप्राप्त केंद्रात उपचार: तुमच्या आयुष उपचाराचा खर्च तेव्हाच इन्शुरन्सद्वारे मिळू शकेल, जेव्हा तुम्ही सरकारी किंवा इन्शुरन्स कंपनीने मान्यताप्राप्त आयुष केंद्रात उपचार घेत असाल. यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचुरोपॅथी इ. केंद्रांचा समावेश असतो.
- रुग्णालयात दाखल होणे आवश्यक: बऱ्याच वेळा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असे नमूद असते की आयुष उपचारांचा खर्च केवळ तेव्हा मिळेल, जेव्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागते. म्हणजेच तुम्ही घरी उपचार घेत असल्यास त्याचा इन्शुरन्सने फायदा मिळणार नाही.
- उपचाराचा प्रकार: आयुष अंतर्गत वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा समावेश असतो. यामध्ये पंचकर्म, योग-प्राणायाम, होमिओपॅथीचे औषधोपचार, सिद्ध उपचार इत्यादी उपचार येतात. तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणकोणत्या उपचारांचा समावेश आहे हे तपासणे महत्त्वाचे आहे. काही पॉलिसींमध्ये आयुष ट्रीटमेंट्स साठी कव्हरेजची मर्यादा असते, जसे की एकूण इन्शुरन्स रकमेच्या 25% किंवा 50% पर्यंत.
उदाहरण:
समजा, तुमच्याकडे 10 लाख रुपयांचे आरोग्य इन्शुरन्स कव्हरेज आहे, आणि त्यात आयुष कव्हरेज देखील समाविष्ट आहे. जर तुम्हाला संधिवात (Arthritis) किंवा इतर कोणत्याही दीर्घकालीन आजारावर आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील, जसे की पंचकर्म थेरपी, तर या उपचारासाठी होणारा खर्च तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीतून भरून मिळू शकतो, जर तो मान्यताप्राप्त केंद्रात केला असेल.
हेल्थ इन्शुरन्समध्ये डेकेअर ट्रीटमेंट्स (Daycare Treatments) म्हणजे काय?
डेकेअर ट्रीटमेंट्स म्हणजे, ज्या उपचारांसाठी रुग्णालयात दीर्घकाळ दाखल होण्याची आवश्यकता नसते, त्यांचा समावेश हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये केला जातो. हे उपचार सामान्यतः एक दिवसात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होतात. डेकेअर ट्रीटमेंट्सच्या कव्हरेजने, तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसतानाही, उपचारांचा खर्च कव्हर करणे शक्य होते.
डेकेअर ट्रीटमेंट्स कसे कार्य करतात?
साधारणपणे, डेकेअर ट्रीटमेंट्समध्ये कमी कालावधीचे उपचार समाविष्ट असतात, ज्या दिवसेंदिवस सुधारणा करतात आणि ज्या उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, लहान शस्त्रक्रिया, सर्जिकल प्रक्रियांसाठी, कॅथेटर टाकणे, आय व्ही ड्रिप्स, डायलिसिस इत्यादी ट्रीटमेंट्स यामध्ये समाविष्ट होतात.
तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असल्यास, आणि तुम्ही डेकेअर ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक नाही, तरीही या ट्रीटमेंट्सचा खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करेल.
उदाहरण:
समजा तुमच्याकडे ₹5 लाख कव्हरेज असलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. आणि तुम्ही कॅथेटर टाकण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला आहे. ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण केली जाते, त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात 24 तासांपेक्षा अधिक ठेवण्याची आवश्यकता नाही.
तुमच्या पॉलिसीमध्ये डेकेअर ट्रीटमेंट्सचा कव्हरेज असल्यामुळे, या प्रक्रियेसाठी होणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करेल, जरी तुम्ही रुग्णालयात दीर्घकाळ दाखल झाले नसाल.
- डेकेअर ट्रीटमेंट्सचे फायदे:
रुग्णालयात दीर्घकाळ राहण्याची आवश्यकता नाही: हे उपचार हलक्या आणि कमी जड असतात, जेणेकरून रुग्णालयात दीर्घकाळ दाखल होण्याची आवश्यकता नाही. - डेकेअर ट्रीटमेंट्सच्या मर्यादा:
संपूर्ण उपचारांचा खर्च कव्हर न होणे: काही पॉलिसीजमध्ये, डेकेअर ट्रीटमेंट्सचे कव्हरेज पूर्णपणे नाही असू शकते, किंवा तुम्हाला काही विशेष ट्रीटमेंट्ससाठी मर्यादा लागू होऊ शकतात.
प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन (Pre and Post Hospitalisation) म्हणजे काय?
प्रि हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन हे दोन महत्त्वाचे बेनिफिट्स आहेत, जे तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये उपचाराच्या वेळेपूर्वी आणि नंतर होणाऱ्या खर्चांचे कव्हरेज देतात.
- प्रि हॉस्पिटलायझेशन म्हणजे, तुमचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी, तुम्ही केलेल्या उपचारांचे खर्च कव्हर करणे.
- पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्यापाठोपाठ, तुमच्यावर उपचारासाठी झालेल्या खर्चांचे कव्हरेज मिळवणे.
प्रि हॉस्पिटलायझेशन कसे कार्य करते?
प्रि हॉस्पिटलायझेशन बेनिफिट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी केलेल्या उपचारांचा खर्च कव्हर करतो. हे सामान्यतः 30 ते 60 दिवसांपूर्वी पॉलिसीच्या अटींवर आधारित लागू होऊ शकते.
उदाहरण:
समजा तुमच्याकडे ₹5 लाख कव्हरेज असलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि तुम्हाला कॅन्सरसाठी उपचार सुरू करायचे आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरकडून काही तपासण्या, चाचण्या आणि उपचार घेतले आहेत, जे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी केले आहेत.
जर तुमच्या पॉलिसीमध्ये प्रि हॉस्पिटलायझेशन बेनिफिट असला, तर त्यामधील खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करेल. उदाहरणार्थ, चाचण्या आणि उपचारांचा खर्च ₹50,000 असेल, तर पॉलिसी ते कव्हर करेल.
पोस्ट हॉस्पिटलायझेशन कसे कार्य करते?
पोस्ट हॉस्पिटलायझेशन बेनिफिट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर उपचार पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या खर्चाचे कव्हर करते. यामध्ये डॉक्टरच्या फॉलो-अप चेकअप्स, औषधांचे खर्च, किंवा घरगुती उपचारांचा समावेश होतो. हे सामान्यतः 30 ते 90 दिवसांपर्यंत लागू होऊ शकते.
उदाहरण:
समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये हृदय शस्त्रक्रिया केली आणि तुमची पॉलिसी 30 दिवसांचे पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हरेज देत आहे. तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतर तुमच्या औषधांचा खर्च ₹20,000 आला आणि तुम्ही डॉक्टरकडून काही फॉलो-अप चेकअप केले आहेत.
तर, या खर्चांसाठी तुम्हाला पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हरेज मिळेल, आणि इन्शुरन्स कंपनी या खर्चाची काही रक्कम तुम्हाला परत देईल.
प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचे फायदे:
- संपूर्ण उपचार खर्च कव्हर होतो: प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन बेनिफिट्समुळे तुमच्या हॉस्पिटलायझेशनपूर्वी आणि नंतरचे उपचार खर्च कव्हर होतात. यामुळे तुमच्या आरोग्य खर्चावरची आर्थिक ताण कमी होतो.
- डॉक्टर फॉलो-अप खर्च: अनेक गंभीर आजारांसाठी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर डॉक्टर फॉलो-अप चेकअप किंवा औषधांचे खर्च असतात. यासाठी पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हरेज अत्यंत उपयुक्त ठरते.
प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनची मर्यादा:
- मर्यादित कालावधी: प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन बेनिफिट्सचा कालावधी पॉलिसीच्या अटींवर आधारित असतो. सामान्यतः प्रि हॉस्पिटलायझेशनचा कालावधी 30 ते 60 दिवस असतो आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा कालावधी 30 ते 90 दिवस असतो. यापेक्षा जास्त कालावधी लागू होईल असे नाही.
- मर्यादित खर्च: काही पॉलिसीमध्ये प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी ठराविक रक्कम असू शकते, ज्या मर्यादेमध्ये तुम्हाला कव्हरेज मिळेल. उदाहरणार्थ, ₹10 लाख कव्हरेज असलेल्या पॉलिसीमध्ये प्रि आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी ₹50,000 ची मर्यादा असू शकते.
मॅटर्निटी कव्हर म्हणजे काय?
मॅटर्निटी कव्हर म्हणजे गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या खर्चासाठी इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारी आर्थिक मदत. हे कव्हर अशा महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांना आई होण्याचा प्लॅन आहे किंवा गर्भधारणेच्या काळात मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची शक्यता आहे.
मॅटर्निटी कव्हरमध्ये काय समाविष्ट असते?
- प्रसूती खर्च (Delivery Expenses): सामान्य प्रसूती (Normal Delivery) किंवा सिझेरियन प्रसूती (C-section) या दोन्ही प्रकारच्या बाळंतपणाचा खर्च कव्हर केला जातो.
- प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची तपासणी (Pre and Post Natal Care): गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या आवश्यक तपासण्या आणि बाळंतपणानंतर होणाऱ्या तपासण्या यांचा खर्च देखील यामध्ये समाविष्ट असतो.
- नवजात बाळाचे कव्हरेज (Newborn Baby Cover): काही मॅटर्निटी कव्हर योजनांमध्ये बाळाच्या जन्मानंतर काही काळासाठी (उदा. 90 दिवस) नवजात बाळाच्या आरोग्याशी संबंधित खर्च कव्हर केला जातो.
- रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च (Hospitalization Expenses): बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च, औषधांचा खर्च इत्यादी कव्हर केले जातात.
- गर्भधारणा तपासण्या (Antenatal Check-ups): गर्भधारणेदरम्यान नियमित तपासण्या, सोनोग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या यांचा खर्च देखील समाविष्ट असतो.
मॅटर्निटी कव्हरमध्ये काय समाविष्ट नसते?
काही योजनांमध्ये नवजात बाळाच्या गंभीर आजारांचे उपचार समाविष्ट नसू शकतात.
वैयक्तिक वैद्यकीय उपकरणे, अतिरिक्त सेवा, किंवा वैयक्तिक खर्च (उदा. रूम अपग्रेड) यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.
वेटिंग पिरियड (Waiting Period):
मॅटर्निटी कव्हर बहुतेक विमा योजनांमध्ये लागू करण्यासाठी एक वेटिंग पिरियड असतो. याचा अर्थ असा की, पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्वरित मॅटर्निटी कव्हर मिळणार नाही. सामान्यतः हा वेटिंग पिरियड 9 महिने ते 4 वर्षेपर्यंत असू शकतो, यानंतरच तुम्ही या कव्हरचा लाभ घेऊ शकता.
मॅटर्निटी कव्हर कधी घ्यावे?
जर तुम्ही दीर्घकालीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल आणि लवकरच कुटुंब वाढवण्याचा विचार करत असाल तर मॅटर्निटी कव्हरची योजना आधीच घेणे चांगले.
वेटिंग पिरियड असल्यामुळे, गर्भधारणेची योजना करण्याआधीच पॉलिसी घेणे फायदेशीर ठरते
नॉन-पेएबल एक्स्पेन्सेस (Non-Payable Expenses) म्हणजे काय?
नॉन-पेएबल एक्स्पेन्सेस म्हणजे अशा खर्चांचा समावेश जो इन्शुरन्स कंपनीने भरपाई करण्यास तयार नसते किंवा जो पॉलिसीच्या अटींनुसार कव्हर केले जात नाहीत. हे खर्च रुग्णाकडूनच किंवा त्याच्या कुटुंबाकडून भरावे लागतात.
उदाहरणार्थ:
- हॉस्पिटलायझेशन दरम्यान लागणारे काही नॉन-मेडिकल खर्च:
जसे की रुग्णालयातील रजिस्ट्रेशन फी, हातमोजे (Gloves), मास्क (Masks), नेबुलायझर किट्स (Nebulizer kits), फूड आणि डायट इत्यादींचा खर्च इन्शुरन्स कंपनी भरत नाही. - अनावश्यक टेस्ट किंवा उपचार:
जर डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचारांपेक्षा जास्त टेस्ट किंवा उपचार केले गेले आहेत, तर त्यांचा खर्च इन्शुरन्स कंपनी भरत नाही. - पॉलिसीमध्ये जोडलेल्या अटींनुसार वगळलेले खर्च:
जर आपल्या पॉलिसीमध्ये काही खर्च वगळले गेले आहेत (जसे की, कॉस्मेटिक सर्जरी, दात बदलणे, ग्लासेस/कॉन्टॅक्ट लेन्स खरेदी), तर त्यांचा खर्च आपल्याला स्वतः भरावा लागेल.
उदाहरण:
समजा, आपल्याकडे ₹5 लाखांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. आपण रुग्णालयात ₹4 लाखांच्या उपचारांसाठी गेला. परंतु, त्यात ₹50,000 नॉन-पेएबल एक्स्पेन्सेसचा समावेश आहे (जसे की, अतिरिक्त रुम फी, अनावश्यक टेस्ट). इन्शुरन्स कंपनी ₹3.5 लाख रक्कम भरेल, आणि उर्वरित ₹50,000 आपल्याला स्वतः भरावे लागतील.
नॉन-पेएबल एक्स्पेन्सेस हे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
साधारणता अश्या पॉलिसी घेणे योग्य ठरेल ज्याच्यात नॉन-पेयेबल एक्स्पेन्सेस कव्हर केले जातात किंवा ज्यामध्ये नॉन-पेयेबल एक्स्पेन्सेस चे अतिरिक्त कवर समाविष्ट आहे.
डिसीज वाईज लिमिट (Disease-Wise Limit) म्हणजे काय?
डिसीज वाईज लिमिट म्हणजे, इन्शुरन्स कंपनी काही विशिष्ट आजारांसाठी खर्चाची एक विशिष्ट मर्यादा (Limit) ठेवते. जर त्या आजाराच्या उपचारांचा खर्च त्या मर्यादेपेक्षा जास्त पडला, तर उर्वरित रक्कम रुग्णाकडूनच भरावी लागते.
जर आपल्या पॉलिसीची एकूण सम इन्शुर्ड ₹5 लाख असेल, तरीही काही विशिष्ट आजारांसाठी इन्शुरन्स कंपनी विशिष्ट मर्यादा ठेवू शकते. काही आजारांच्या उपचारांचा खर्च खूप जास्त असतो (उदा., कॅंसर, हृदयाची शस्त्रक्रिया). यामुळे इन्शुरन्स कंपनी त्यांच्यासाठी विशिष्ट मर्यादा ठेवते. जर उपचारांचा खर्च लिमिटपेक्षा जास्त पडला, तर उर्वरित रक्कम रुग्णाकडूनच भरावी लागते.
उदाहरण:
समजा, तुमच्याकडे ₹10 लाख कव्हरेज असलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि हृदय रोगांसाठी मर्यादा ₹3 लाख आहे. आता, जर हृदय शस्त्रक्रियेचा खर्च ₹2.5 लाख असेल, तर इन्शुरन्स कंपनी ₹2.5 लाख पूर्णपणे कव्हर करेल.
पण, जर हृदय शस्त्रक्रियेचा खर्च ₹5 लाख झाला, तर इन्शुरन्स कंपनी फक्त ₹3 लाख कव्हर करेल आणि उर्वरित ₹2 लाख तुम्हाला स्वतः भरावे लागतील.
जर पॉलिसीमध्ये डिसीज वाईज लिमिट असेल, तर प्रीमियम कमी असतो पण जर आजाराचा खर्च लिमिटपेक्षा जास्त असेल, तर उर्वरित रक्कम रुग्णाकडूनच भरावी लागते.
काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये डिसीज वाईज लिमिट नसतात. अशा पॉलिसींचा प्रीमियम अधिक असतो, परंतु त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण कव्हरेज मिळते.
डोमिसिलरी खर्च (Domiciliary Expense) म्हणजे काय?
डोमिसिलरी खर्च म्हणजे रुग्णालयात न जाता, घरातच केलेल्या उपचारांवर येणारा खर्च. सामान्यत हेल्थ इन्शुरन्स मध्ये हे खर्च कव्हर होतात, जेव्हा रुग्णाला घरात राहूनच उपचार घ्यावे लागतात, कारण तो रुग्णालयात हलवला जाऊ शकत नाही किंवा रुग्णालयात बेड उपलब्ध नसतो.
उदाहरण:
समजा, तुमच्याकडे 10 लाख रुपयांचे आरोग्य इन्शुरन्स कव्हरेज आहे. तुम्ही गंभीर आजारी असाल आणि डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे, पण काही कारणांमुळे तुम्हाला घरीच उपचार घ्यावे लागले जसे की ICU सुविधांसह घरी उपकरणे बसवणे, औषध उपचार, डॉक्टरांची सेवा इत्यादी. या सर्व गोष्टींसाठी होणारा खर्च डोमिसिलरी खर्च म्हणून गणला जाईल, आणि तो तुमच्या आरोग्य इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट असल्यास, इन्शुरन्स कंपनी तो खर्च परतफेड (Reimburse) करेल.
COVID-19 च्या महामारीच्या वेळी, अनेक रुग्णालयात बेड्स उपलब्ध नव्हते आणि रुग्णालयांमध्ये दाखल होणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत, ज्या रुग्णांना घरातच उपचार घ्यावे लागले, त्यांना ICU उपकरणे, ऑक्सिजन सपोर्ट, डॉक्टरांचा सल्ला, आणि औषध उपचार घरातच दिले गेले. या सर्व खर्चांसाठी डोमिसिलरी खर्च म्हणून इन्शुरन्स कंपनीने कव्हरेज दिले, कारण रुग्णालयात दाखल होणे शक्य नव्हते आणि डॉक्टरांच्या लेखी सल्ल्यानुसार उपचार केले गेले होते.
अटी:
काही आरोग्य इन्शुरन्स पॉलिसीमध्ये डोमिसिलरी उपचारांचा खर्च कव्हर केला जातो, परंतु त्यासाठी काही विशिष्ट अटी लागू असतात:
- डॉक्टरांचे निर्देश आवश्यक: तुमचे डॉक्टर तुम्हाला घरीच उपचार घ्यावयाचा सल्ला देतील तेव्हा हे कव्हर मिळू शकते. डॉक्टरांनी दिलेला लेखी सल्ला असणे आवश्यक असते.
- रुग्णालयात दाखल होऊ न शकणे: रुग्णालयात दाखल होणे शक्य नसेल, जसे की गंभीर आजार किंवा रुग्णालयात जागा उपलब्ध नसणे, या परिस्थितीत डोमिसिलरी उपचारांचे कव्हरेज दिले जाते.
- विशिष्ट आजारांचा समावेश: काही पॉलिसींमध्ये डोमिसिलरी खर्चाचा समावेश असला तरी, हे केवळ काही विशिष्ट आजारांसाठीच लागू होऊ शकते. पॉलिसीमधील अटी तपासणे महत्त्वाचे आहे.
- कव्हरेज मर्यादा: डोमिसिलरी खर्चासाठी कव्हरेजला मर्यादा असते. हे कव्हरेज रुग्णालयातील खर्चाइतके पूर्ण नसू शकते, त्यामुळे मर्यादा किती आहे ते तपासून घ्या.
निष्कर्ष
सर्व संज्ञांची माहिती समजून घेतल्यानंतर, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या विविध पैलूंबद्दल स्पष्टता येईल. यामुळे योग्य पॉलिसीची निवड करण्यास मदत होईल आणि भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील. अशा प्रकारे, पॉलिसी घेण्याचा निर्णय अधिक सुज्ञपणे घेता येईल.